आजकाल स्ट्रोक (Stroke) हा फक्त वृद्ध लोकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तणावपूर्ण जीवनशैली, चुकीचा आहार, कमी व्यायाम, ब्लड प्रेशर आणि डायबिटीज यामुळे तरुण वयातसुद्धा स्ट्रोक येण्याचे प्रमाण वाढत आहे. अनेक वेळा स्ट्रोक अचानक येतो असे आपल्याला वाटते, पण प्रत्यक्षात शरीर आधीच काही चेतावणी लक्षणे देत असते. ही लक्षणे वेळेवर ओळखली तर मोठा धोका टाळता येऊ शकतो.
स्ट्रोक म्हणजे नक्की काय?
मेंदूला जाणाऱ्या रक्तपुरवठ्यात अचानक अडथळा निर्माण झाला किंवा मेंदूतील एखादी रक्तवाहिनी फुटली, तर त्या अवस्थेला स्ट्रोक असे म्हणतात. मेंदूला पुरेसा ऑक्सिजन आणि रक्त मिळाले नाही, तर काही मिनिटांतच मेंदूच्या पेशींना कायमचं नुकसान होऊ शकते. म्हणूनच स्ट्रोक ही मेडिकल इमर्जन्सी मानली जाते.
स्ट्रोक येण्यापूर्वी शरीर कशा प्रकारे इशारा देते?
अनेक लोक हे लक्षणं थकवा, गॅस किंवा साधी कमजोरी समजून दुर्लक्ष करतात. पण हीच चूक जीवघेणी ठरू शकते.
- सर्वात सामान्य लक्षण म्हणजे अचानक चेहऱ्याचा एक भाग वाकडा होणे. हसताना तोंड एका बाजूला ओढले जाते किंवा डोळा पूर्ण उघडत नाही. काही वेळा व्यक्तीला स्वतःलाच हे जाणवत नाही, पण आजूबाजूच्या लोकांना ते लगेच दिसून येते.
- दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे हात किंवा पायात अचानक कमजोरी येणे. विशेषतः शरीराच्या एका बाजूला हात उचलता न येणे, वस्तू पकडता न येणे किंवा पाय ओढत चालावे लागणे हे स्ट्रोकचे स्पष्ट संकेत असू शकतात.
- बोलण्यात अडचण येणे हेही धोक्याचे लक्षण आहे. शब्द अस्पष्ट ऐकू येतात, वाक्य पूर्ण करता येत नाही किंवा समोरचा काय बोलतोय ते समजत नाही. काही वेळा व्यक्तीला योग्य शब्द आठवत नाहीत. हे लक्षण फार महत्वाचे असून लगेच वैद्यकीय मदत घेणे गरजेचे असते.
- काही लोकांना अचानक चक्कर येते, उभं राहता येत नाही किंवा संतुलन बिघडते. चालताना तोल जातो किंवा पडण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर एका किंवा दोन्ही डोळ्यांनी धूसर दिसणे, डबल दिसणे किंवा अचानक दृष्टी कमी होणे हेही स्ट्रोकचे गंभीर संकेत असू शकतात.
- जर कधीही न झालेली तीव्र डोकेदुखी अचानक सुरू झाली, विशेषतः उलटी, मान दुखणे किंवा बेशुद्ध पडण्याची भावना यासोबत असेल, तर ती स्ट्रोकची चेतावणी असू शकते. अशी डोकेदुखी साधी मायग्रेन समजून दुर्लक्ष करू नये.
ही लक्षणं दिसल्यास काय करावे?
स्ट्रोकच्या बाबतीत वेळ खूप महत्वाची असते. लक्षणे दिसताच घरगुती उपाय, वाट पाहणे किंवा औषध स्वतः घेणे टाळावे. रुग्णाला शक्य तितक्या लवकर जवळच्या हॉस्पिटलच्या इमर्जन्सीमध्ये दाखल करणे आवश्यक असते. लवकर उपचार मिळाले तर मेंदूचे नुकसान टाळता येऊ शकते आणि रुग्णाचा जीवही वाचू शकतो.
स्ट्रोक टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?
ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवणे खूप गरजेचे आहे. धूम्रपान, दारू यापासून दूर राहणे, नियमित चालणे किंवा हलका व्यायाम करणे आणि तणाव कमी करणे हे स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करते. वेळोवेळी हेल्थ चेकअप करणे ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे.